मुंबई : जगातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 लाखांच्या पार झाला आहे, तर या व्हायरसमुळे आतापर्यंत 3,03,345 जणांनी आपले जीव गमावले आहेत. तर मागील 24 तासात 95,519 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले असून 24 तासात 5,305 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात तीन लाख तीन हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32.53 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोरोनाचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळे 2551 बळी गेले आहेत.