जळगाव ;- भावाला शिवीगाळ का केली ? असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर चौघांनी धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा येथे घडली असून चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळा भागात राहणाऱ्या पवन भोई (वय-२५) हा आपल्या भावासह राहतो. रविवारी ९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गल्लीतील शुभमन शिवदे, निखिल शिवदे, सागर शिवदे आणि सनी शिवदे यांनी पवन भोई याच्या भावाला काहीही कारण नसतांना शिवीगाळ केली. त्यावेळी भाऊ रडत असल्याचे पाहून पवन भोई याने याबाबत चौघांकडे विचारणा केल्याचा राग मनात ठेऊन चौघांनी पवन भोई याला पाठीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. पवन भोई याला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पवन भोई याच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री उशीरा चौघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करत आहे.