चाळीसगाव ( प्रतिनिधी ) ;– पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत ५३ लाभार्थ्यांच्या खात्यात ५ लाख ३० हजार कर्ज भांडवल जमा, आमदार कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत शहरातील १८३ अर्ज ऑनलाईन दाखल झाले आहेत .
लॉकडाऊन मुळे रोजगार गेला, कष्ट करून कमावण्याची सवय, आमदारांच्या कार्यालयातून झालेल्या पाठपुराव्याने व्यवसायासाठी भांडवल मिळून पुन्हा व्यवसाय सुरु करू शकलो – सुखदेव जाधव (खारी पाव विक्रेते, सेवानिवृत्त मिल कामगार, शिवशक्ती नगर, चाळीसगाव)
चाळीसगाव – मी आधी भडगाव रोड येथील मिल मध्ये कामाला होतो, मिल बंद झाल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी २०१० पासून रस्त्यावर हातगाडी वर खारी, पाव, टोस्ट विक्रीचा व्यवसाय करतो. पहिल्या लॉकडाऊन मध्ये रस्त्यावरील व्यवसाय बंद झाल्याने रोजगार गेला, नंतर हळूहळू व्यवहार सुरुळीत होऊ लागल्यानंतर विक्रीसाठी माल कुठून आणायचा हा प्रश्न उभा राहिला. कारण जवळ असलेले सर्व भांडवल खर्च झाले होते. त्यानंतर आमदार मंगेशदादा यांच्या कार्यालयामार्फत पंतप्रधान स्वनिधी योजनेतून १० हजार रुपयांचे कर्ज मिळत असल्याची माहिती मिळाली. आमदारांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात गेल्यानंतर त्याठिकाणी असलेले स्वयंसेवक यांनी आस्थेवाईक चौकशी करून काही कागदपत्र आणायला सांगितली. कागदपत्र पूर्तता केल्यानंतर त्यांनी योजनेची पूर्ण माहिती दिली व माझा ऑनलाईन अर्ज देखील भरून घेतला. नंतर चाळीसगाव नगरपालिकेच्या मार्फत माझ्या व्यवसायाची खात्री करण्यात आल्यानंतर माझे कर्जप्रकरण मंजूर करण्यात आले. मात्र बँकेत अनेकवेळा जाऊन देखील आज या उद्या या अशी चालढकल सुरु होती. सदर बाब आमदार साहेबांच्या कार्यालयात सांगितल्यानंतर तेथील जनसेवकांनी स्वतः बँकेत येऊन सबंधित अधिकारी यांना कर्ज वितरीत करण्याची विनंती केली आणि माझ्या खात्यात दुसऱ्याच दिवशी १० हजार रुपये जमा झाले. या मिळालेल्या कर्ज भांडवलातून मी पुन्हा सकाळी ७ ते ११ या वेळेत माझी फिरत्या हातगाडीच्या माध्यमातून खारी पाव विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. कष्ट करून कमवायची सवय असल्याने कुणापाशीही हात पसरणे जमले नाही. पंतप्रधान मोदिजींची स्वनिधी योजना तळागाळात खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत राबवण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयामार्फत जी मदत मिळाली त्याबद्दल आभार मानावेत तेव्हडे कमी आहेत, अशी प्रतिक्रिया चाळीसगाव NTC मिल येथील सेवानिवृत्त कर्मचारी, शिवशक्ती नगर येथील रहीवासी सुखदेव दगा जाधव यांनी दिली. ते सन २०१० पासून खारी पाव विक्रीचा व्यवसाय करतात. अश्या एकच नव्हे तर तब्बल ५३ हून अधिक पथविक्रेते व्यावसायिक यांना उभारी देण्याचे काम चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयामार्फत लॉकडाऊन काळात करण्यात आले व खऱ्या अर्थाने शेवटच्या ओळीतील शेवटच्या घटकाचा विकास हे ध्येय ठेवत आपल्या कार्यालयाला दिलेले ‘अंत्योदय’ नाव सार्थ ठरविले आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका हा रस्त्यावरील पथविक्रेते यांना सर्वात जास्त बसला होता. हातावर पोट असणाऱ्या या कष्टकरी वर्गाला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पंतप्रधान स्वनिधी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत नगरपालिका क्षेत्रात नोंदणीकृत असणाऱ्या रस्त्यावरील छोटे व्यावसायिक यांना १० हजार रुपयांचे अल्प व्याजदराचे कर्ज उपलब्ध करण्यात येणार होते. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या अंत्योदय जनसेवा कार्यालयामार्फत स्वनिधी योजनेच्या प्रभावी अमलबजावणी साठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करून पथविक्रेते लाभार्थी यांना पूर्ण मार्गदर्शन, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यापासून ते लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेणे, त्यांना नगरपालिका मार्फत LOR उपलब्ध करून देणे व बँकांशी समन्वय साधून लाभार्थ्याच्या खात्यात प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यासाठी या मदत कक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा केला गेला. स्वतः आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शहरातील सर्व बँकांचे व्यवस्थापक यांची बैठक घेऊन पथविक्रेते यांना मानवीय दृष्टीकोनातून मदत करण्याचे आवाहन केले होते.
लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार, खाजगी कार्यालये ठप्प असताना गोर गरीब कष्टकरी जनतेला आधार देण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयामार्फत पंतप्रधान स्वनिधी योजनेचे १८३ अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले. यापैकी ५३ लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार याप्रमाणे ५ लाख ३० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. पहिला लॉकडाऊन संपून आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात दुसऱ्यांदा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या कठीण काळात स्वनिधी योजनेतून कर्ज स्वरुपात मिळालेल्या १० हजार रुपयांच्या भांडवलाची मोठी मदत झाल्याची भावना अनेक पथविक्रेते यांनी व्यक्त केली. सदर १८३ अर्जदार यांच्यापैकी ५३ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. मात्र उर्वरित अनेक अर्जदार यांचे कर्ज प्रकरण मंजूर झाले असून त्यांच्याशी संपर्क साधून हा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात लाभार्थी संख्या अजून वाढणार आहे.








