मुंबई (वृत्तसंस्था ) ;- कोरोनाला अटकाव करण्यासाठी 5 ते 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला होता. आता सरकारने हे निर्बंध आणखी कडक केले आहेत. उद्यापासून (ता.21) 1 मेपर्यंत भाजीपाला, किराणा आणि दूध दुकाने सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू राहतील. याचबरोबर आणखी काही निर्बंध वाढवण्याचा विचार राज्य सरकार करीत असून, राज्याची वाटचाल आता संपूर्ण लॉकडाउनतच्या दिशेने सुरू झाली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना टोपे म्हणाले की, सरकार आणखी निर्बंध वाढवण्याचा विचार करीत आहे. किराणा, फळे, भाजीपाला आणि दूध यासह इतर आवश्यक वस्तू विकणारी दुकाने आता सकाळी 7 ते 11 या चार तासातच खुली राहतील.
राज्यात निर्बंध लागू करुनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. लोक किराणा, दूध आदी वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली दिवसभर फिरत असल्याचे चित्र आहे. आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी चार तास खुली ठेवण्याचा आदेश लवकरच काढण्यात आला आहे.
नव्या आदेशानुसार असे असतील निर्बंध
1. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेत, दूध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, मासे आणि अंडी), कृषीविषयक दुकाने, पावसाळी साहित्याची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली राहतील.
2. होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.
3. अत्यावश्यक सेवांना कोणतेही बंधन नसेल.