जळगाव;- जळगाव मनपात आज ऑनलाईन महासभेचे आयोजन सकाळी प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते . मात्र सभा सुरु असता विरोधकांनी इतर महापालिकांमध्ये ऑफलाईन महासभा होत असतांना जळगाव मनपातच ऑनलाईन महासभेचा आग्रह का केला जात आहे असा आरोप करून विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला . तसेच सत्ताधारी नागरसेवकांनीही सभागृहात प्रवेश केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले .

राज्यातील इतर महापालिकांमध्ये ऑफलाईन सभा सुरु झालेल्या असतांना जळगाव महापालिकेत ऑनलाईन सभा घेतली जात असून यात होणारी चर्चा शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी आरोप करत सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या सोबत शिवसेनेचे गटनेते बंटी जोशी, नगरसेवक इबा पटेल, गणेश सोनवणे, प्रशांत नाईक यांनी देखील प्रवेश केला. त्यांनी आपल्या हातातील मोबाईल महापौर सौ. भारती सोनवणे व आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दाखवत सभेत काय होत आहे हे काहीच कळत नसल्याची तक्रार केली.
याच वेळी सत्ताधारी गटाचे नगरसेवक कैलाश सोनवणे, सचिन पाटील, चेतन सनकत, कुलभूषण पाटील, किशोर बाविस्कर आदींनी सभागृहात प्रवेश केला . नगरसेवक कैलास सोनवणे यांनी देखील ऑफलाईन सभेबाबत महापौर व आयुक्त यांच्यासोबत चर्चा केली असता ऑफलाईन सभेबाबत वारंवार शासनाकडे पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन सभेची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. आयुक्तांनी समजूत घालून देखील शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात थांबून सभेत प्रत्यक्ष सहभाग घेतला तर भाजपचे नगरसेवकांनी ऑफलाईन सभेत सहभाग घेतला.







