डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयाप्रती व्यक्त केले ऋण
जळगाव – तालुक्यातील नशिराबाद येथील एपीआय सचिन कापडणीस यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपचारामुळे एपीआय कापडणीस यांनी कोरोनावर मात केली असुन त्यांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाप्रती ऋण व्यक्त केले.
नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) असलेले सचिन कापडणीस यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला होता. मात्र तरी देखिल त्यांना अशक्तपणा आणि अस्वस्थ वाटत होते. त्यांनी तात्काळ डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. प्रशासन अधिकारी आशिष भिरूड यांनी एपीआय कापडणीस यांना तात्काळ रूग्णालयात बोलावुन एचआरसीटी तपासणी करून घेतली. त्यात न्युमोनिया असल्याचे निदान झाले. त्यानंतर कापडणीस यांचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर एपीआय कापडणीस यांना उपचारासाठी भरती करून घेण्यात आले. डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयातील डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रय्या कांते, मेडीसीन तज्ञ डॉ. पाराजी बाचेवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कापडणीस यांच्यावर उपचार करण्यात आले. या उपचाराला यश आल्याने एपीआय सचिन कापडणीस यांनी कोरोनावर मात केली. आज त्यांना रूग्णालयातुन सुटी देण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत नशिराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. साळुंखे, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड उपस्थित होते.
रूग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला – कापडणीस
एखाद्याला कोरोना झाला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजात बदलत चालला आहे. वास्तविक अशा रूग्णांना मानसिक आधार देऊन कोरोनाशी लढण्याची ताकद दिली पाहीजे. तसेच जे रूग्ण कोरोनामुक्त होत आहे त्यांना देखिल समाजात चांगली वागणूक द्यावी. कोरोनाला घाबरू नका पण काळजी घ्या असे आवाहन एपीआय सचिन कापडणीस यांनी केले.







