जळगाव : – जिल्हा कारागृहातून तीन आरोपींनी सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला गावठी कट्टा लावत पळ काढल्याची घटना 25 जुलै 2020 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत सागर संजय पाटील (23 शिवाजी नगर, पैलाड, अमळनेर), गौरव विजय पाटील (21, रा.तांबापुरा, अमळनेर), सुशील अशोक मगरे (32, लेले नगर, पहुर कसबे, ता.जामनेर) असे तीन संशयीत त्यावेळी पसार झाले होते. आरोपींना पसार होण्याकामी जगदीश पुंडलिक पाटील (19, पिंपळकोठा, ता.पारोळा) याने मदत केली होती तर आरोपींना त्यावेळी गावठी कट्टा पुरवणारा संशयीत आनंद उर्फ राहुल गोपाळराव सोनवणे (22, लालचंद नगर, वरूड रोड, शिंदखेडा, जि.धुळे) हा पसार झाला होता. पाच आरोपींविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. दरम्यान, आरोपी आनंद सोनवणे शिंदखेडा येथील बसस्थानकावर आल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.








