जळगाव – नऊ महिने पूर्ण होताच गर्भवती स्त्रीला प्रसुत वेदना जाणवायला लागल्यात, तिला घेऊन तिचे नातेवाईक डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आले, येथील स्त्रीरोग विभागातील तज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफने तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये तिला घेतले आणि तिची सुखरुप प्रसृती केली.
जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेली २८ वर्षीय गर्भवती प्रिया (नाव बदललेले) ला कळा यायला लागल्याने खाजगीतील मॅटर्निटी होममध्ये नेण्यात आले, मात्र सद्यस्थीतीला कोरोनाचे संक्रमण पाहता तेथील डॉक्टरांनी गर्भवतीला अॅडमिट करुन घेण्यास नकार दिला, एक दोन हॉस्पीटलमध्येही सारखाच अनुभव आल्याने एका डॉक्टरांनी त्यांना डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला, त्यावेळी तात्काळ महिलेला अॅम्बुलन्समध्ये टाकून रुग्णालयात आणले, याप्रसंगी महिलेचे भरते दिवस असल्याने तिला वेदना सहन करणे अशक्य होत होते, त्यामुळे तातडीने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ.माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.स्नेहल गवारे, डॉ.जया शिंदे, डॉ.दिपीका लालवाणी यांनी तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये तिला घ्यायला सांगितले, लगेेचच तिची प्रसुती करण्यात आली असून बाळ-बाळांतीण सुखरुप आहे.
ही सर्व प्रक्र्रिया सुरु असतांना तिची कोरोना टेस्टही करुन घेण्यात आली, यात मात्र तिचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांच्या पायाखालीची जमिनच सरकली, कारण नॉर्मल गर्भवतीची प्रसुती करण्याची किट ही साधी असते आणि अशा पॉझिटीव्ह रुग्णांची प्रसुती असो वा शस्त्रक्रिया यासाठी स्वतंत्र वेगळी किट डॉक्टरांसह ओटीत वॉश होणार्या प्रत्येकाला घालावी लागते, त्यामुळे डॉक्टरांनाही चिंता भेडसावायला लागली मात्र कोरोना पॉझिटीव्ह स्त्रीला आपण सुखरुप मातृत्व प्रदान करु शकलो याचा आनंदही येथील स्त्रीरोग तज्ञांना झाला. पुढील उपचारासाठी माता आणि बालकाला जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे पाठविण्यात आले.








