मुंबई : गेल्या काही दिवसात बॉलिवूड कलाकार सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या चर्चेत राहिली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी उडी घेतली आहे. पार्थ पवार यांनी मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. याप्रकरणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबतचे पत्र दिले आहे.
पार्थ पवार यांनी हे पत्र लिहिल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली की गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे. गृहमंत्री देखील राष्ट्रवादीचे आहेत असे असून देखील पार्थ पवार यांनी सीबीआयकडे चौकशी करण्याची मागणी केली. मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का? असा सवाल ही यामुळे उपस्थित होत आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणी गरज पडल्यास करण जोहरची चौकशी करू, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. महेश भट्ट यांनी देखील पोलिसात या प्रकरणी आपला जबाब नोंदवला आणि त्यातच पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकारणाची एक वेगळीच किनार लागली आहे.







