मुक्ताईनगरजवळील घटना
मुक्ताईनगर ;- भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने कट मारल्याने बंगालकडे कांद्याच्या गोण्या घेऊन जाणारा ट्रक उलटून यात चालक आणि क्लिनर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली . माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊसजवळ मलकापूरहून धुळ्याला जाणाऱ्या खासगी बसने ओव्हरटेक केल्याने ट्रक (सीजी ०४- एमएच ७५६८) वरील ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी झाला . यावेळी कांद्याच्या गोण्या घटनास्थळी विखरून पडल्या होत्या . ट्रकमध्ये नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथून कांद्याच्या गोण्या भरलेल्या होत्या. ट्रक हा पश्चिम बंगालमधील खडकपूर येथे जात होता. क्लिनर नंदकुमार साहू याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तर चालक विक्की भाई याच्या पाठीला जबर मार बसल्याने त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.