नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनिअर राष्ट्रीय पैलवान सागर रानाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात ऑलिम्पियन सुशील कुमार मित्रांसोबत सागरला हॉकी स्टिकने मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सुशील कुमारने स्वत: मित्राच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ शूट करून घेतला होता, जेणेकरून कुस्तीच्या सर्कीटमध्ये त्याचा वचक राहील. व्हिडिओमध्ये, 23 वर्षीय सागर धनकड रक्ताने माखलेला दिसत आहे.
आरोपी सुशील कुमार व अन्य 3 जणांनी त्याला घेराव घातला. प्रत्येकाच्या हातात हॉकी स्टिक दिसत आहे. असे सांगितलं जात आहे की, हा व्हिडिओ स्वत: सुशीलचा साथीदार प्रिन्स दलालने बनवला होता. त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याशिवाय सुशील आणि त्याचा पीए अजय यांच्यासह आणखी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सुशीलचा आणखी एक साथीदार रोहित करोर याला अटक करण्यात आली. तर, 4 आरोपी नीरज बवाना गँग आणि कला-असोदा गँगचे सदस्य आहेत.