नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) ;- चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलरचा करार होणार असल्याची चर्चा सुरू असताना इराणने भारताला मोठा धक्का दिला आहे. इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून हटवले आहे. इराणच्या या निर्णयामुळे भारत व इराणचे संबंध नाजूक वळणावर असल्याचे बोलले जात आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर ४ वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे. अफगाणिस्तान सीमारेषेलगत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार होता. भारताकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तसंच निधी मिळण्यास विलंब होत असल्याचं इराण सरकारने सांगितलं आहे. इराणने आता स्वत:च हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द हिंदू’ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
मागील आठवड्यात इराणचे परिवहन आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी ६२८ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले होते. या रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाणार आहे. ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, इराण रेल्वे विभाग भारताच्या कोणत्याही मदतीविना हा प्रकल्प पूर्ण करणार असून यासाठी राष्ट्रीय विकास निधीची वापर करण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.