सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारातील घटना
सोयगाव (प्रतिनिधी) : सोयगाव तालुक्यात जरंडी, बनोटी, गोंदेगाव, घोसला आदी परिसरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरम्यान जरंडी शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या तीन महिलांच्या अंगावर अचानक वीज कोसळून गंभीर भाजल्याची घटना शुक्रवारी दिनांक १८ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.
सोयगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने शेतातील कापूस भिजला आहे. दरम्यान जरंडी शिवारात गट क्र-१५५ मध्ये स्वतःच्या मालकीच्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या शोभाबाई रामेश्वर चौधरी (वय ५२), रविना मुकेश चौधरी (वय २७), व योगिता विष्णू वाघ (वय ३२ तिन्ही रा. जरंडी) या तिन्ही महिलांच्या अंगावर वीज कोसळून त्या तिघेही भाजल्या आहे. त्यापैकी योगिता वाघ व शोभाबाई चौधरी या किरकोळ जखमी झाल्या असून रविना चौधरी या गंभीर जखमी आहे.
त्या तिघांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी माळेगाव पिंपरी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे माळेगाव, पिंपरी शिवारात कपाशी भिजून खराब झाली आहे. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.