भोकर – किनोद मार्गावर दुचाकी अडवून लुटले
जळगाव ( प्रतिनिधी ) – केळी विक्री केलेल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेवून घरी जाणाऱ्या भोकर-भादली येथील शेतकऱ्याला अज्ञात पाच हल्लेखोरांनी बेदम मारहाण करीत रोख ५० हजार रुपयांसह गळ्यातील सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी हिसकावून फरार झाल्याची घटना काल सायंकाळी घडली.
निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७ , रा. भोकर भादली ता. जळगाव) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यावर जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निवृत्ती साळुंखे यांनी शेतातील केळी किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केली होती. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे दुचाकीने सायंकाळी किनोद येथे गेले व्यापाऱ्याकडून ५० हजार रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीवरून भोकर भादली येथे परतत होते. त्याच्यासोबत विठू उर्फ प्रकाश (पुर्ण नाव माहित नाही) होते. भोकर ते किनोद रस्त्यावर अज्ञात पाच जणांनी निवृत्ती यांची दुचाकी अडविली व पैश्यांची मागणी केली त्यांच्यात बाचाबाची झाली. हल्लेखोरातील एकाने काठी निवृत्ती यांच्या डोक्याला मारली ते जखमी झाले. त्यांच्या जवळची ५० हजाराची रोकड , गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरी हिसकावून पोबारा केला जखमी अवस्थेत निवृत्ती यांनी चुलतभाऊ विजय पाटील यांना फोनकरून माहिती दिली. विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी निवृत्ती पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.