भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनाची कामगिरी
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे भुसावळ परिसरातील दोन ठिकाणी सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल संशयित आरोपीला अटक केली आहे. संशयित आरोपी मझहर अब्बास जाफर (वय १८ वर्षे, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याने अमळनेर आणि खामगाव तालुक्यात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पोलीस पथकाने मझहर अब्बास जाफर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अमळनेर पोलीस ठाण्याच्या आणि जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.(केसीएन)त्याने अनुक्रमे ९० हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम सोन्याची पोत आणि ७० हजार रुपये किमतीची १४. ०५ ग्रॅम सोन्याची चैन असे एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर संशयिताला पुढील तपासासाठी अमळनेर पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाधन, तसेच पोलीस कर्मचारी विजय नेरकर, प्रशांत परदेशी, योगेश माळी, राहुल वानखेडे, भुषण चौधरी, सचिन चौधरी, अमर आढळे, योगेश महाजन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.