सोनार समाजाकडून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : विविध मागण्यांसाठी शहरातील सोनार समाजाच्या वतीने तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा, सोनार हितकारीणी सभा, अहीर सोनार महिला मंडळ आणि ऋणानुबंध वधू-वर पालक मेळावा समिती २०२५, जळगाव जिल्हा सुवर्णकार कारागीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी दि. १९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन समाजातील विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली व निवेदन सादर करण्यात आले. मुंबई प्रांतासह अखंड हिंदुस्थानचे शिल्पकार व महान समाजसुधारक नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई टर्मिनलला देण्यात यावे. तसेच संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजासाठी तात्काळ सोनार समाजाचे ३ अशासकीय सदस्य नियुक्त करून महामंडळाचे कार्य प्रारंभ करण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रसंगी माजी आ. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष संजय विसपुते, सचिव संजय पगार व समस्त सुवर्णकार बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. समाजाच्या या मागण्यांसाठी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.