जळगावात विद्युत कॉलनीत घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात किरकोळ वादातून मारामारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत कॉलनी भागात सोलर बसवण्याचे साहित्य कोणाचे आहे, अशी साधी विचारणा केल्याचा राग आल्याने एका तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लोकेश जगन्नाथ माळी (वय २८, रा. साई रचना अपार्टमेंट, विद्युत कॉलनी, जळगाव) हे २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:१५ वाजेच्या सुमारास आपल्या घरी होते. यावेळी अपार्टमेंटमध्ये सोलर बसवण्याचे साहित्य पडलेले होते. लोकेश यांनी हे साहित्य कोणाचे आहे, अशी विचारणा केली. या साध्या प्रश्नाचा राग आल्याने शेजारी राहणाऱ्या हिमांशु सुधाकर चोपडे याने लोकेश यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने प्रहार करून त्यांना जखमी केले. इतक्यावरच न थांबता, हिमांशुची आई आणि वडील सुधाकर चोपडे यांनी देखील लोकेश यांच्या आई-वडिलांना चापटबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाणीदरम्यान आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. “तुम्हाला संपवून टाकू,” अशी जीवे मारण्याची धमकी देखील यावेळी देण्यात आली. या घटनेमुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. लोकेश माळी यांनी रात्री १०:२१ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी हिमांशु चोपडे, सुधाकर चोपडे आणि हिमांशुची आई अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भिका खाटीक करीत आहे.









