चोपडा तालुक्यात उमर्टी येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील उमर्टी येथे एक अतिशय हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका २८ वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलासह आणि १५ दिवसांच्या नवजात बाळासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारी सकाळी ही घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत महिलेचे नाव पमिता डोंगरसिंग पावरा (२८) असे असून, तिच्यासोबत तिचा मोठा मुलगा विरेन (अडीच वर्षे) आणि १५ दिवसांचे बाळ अशा तिघांचे मृतदेह बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वतःच्याच शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. पमिता ही मंगळवारपासून दोन्ही मुलांसह बेपत्ता होती. पमिता ही काही दिवसांपूर्वीच बाळंतीण झाली होती आणि विश्रांतीसाठी आपल्या माहेरी आली होती.
दोन-तीन दिवसांपूर्वीच तिचा पती तिला सासरी घेऊन गेला होता. त्यानंतर मंगळवारी ती बेपत्ता झाली आणि बुधवारी तिघांचेही मृतदेह सापडले. या घटनेबाबत मृत महिलेचा भाऊ आकाश पावरी याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पमिताची प्रसूती होऊन केवळ १५ दिवस झाले असल्याने तिला आणखी काही दिवस माहेरी विश्रांती घेऊ द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती.
मात्र, सासरच्या मंडळींनी (मेहुण्यांनी) काहीही न ऐकता तिला जबरदस्तीने सासरी नेले.
मंगळवारी ती बेपत्ता असल्याची आणि बुधवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती सासरकडूनच देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.









