डॉ. किरण पाटील यांची धुळ्यात बदलीची चर्चा
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांची धुळे येथे बदली झाल्याची चर्चा असून त्यांच्या जागी धुळे येथून पदोन्नतीवर महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वप्नील सांगळे हे येत आहेत.
डॉ.किरण पाटील हे पूर्वी जळगावच्या सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक होते. त्यानंतर २०२० साली रुग्णालयात कोरोना काळात भुसावळ येथील ८२ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर त्यांचे निलंबन झाले होते. यानंतर काही महिन्यांनी त्यांना धरणगाव येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली होती. ७ महिन्यांनी त्यांना राज्य शासनाने जळगावचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदोन्नती दिली होती.
दि. २१ जानेवारी २०२१ पासून डॉ. किरण पाटील हे गेल्या पाच वर्षापासून जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या काळात अनेक चांगले निर्णय झाले. मोहाडी येथील स्त्री रुग्णालयदेखील त्यांच्याच काळात सुरू झाले. तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभागात आमूलाग्र बदल डॉ. किरण पाटील यांच्या काळात घडून आलेत. मनुष्यबळ भरती संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय शासनाकडून पारित होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. डॉ. स्वप्नील सांगळे यांनी धुळे येथे काम करत असताना अनेक चांगले शासन निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या तेथील अनुभवाचा फायदा जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय कामांमध्ये निश्चितच होईल.








