महापालिकेत १६ फेब्रुवारीला विक्रेत्यांसह अधिकाऱ्यांची तातडीची बैठक
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात शासनाने प्रतिबंधित केलेल्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा (एकेरी वापराचे प्लास्टिक) वापर अद्यापही सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी आता कडक पावले उचलली आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि पुढील कारवाईची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.

महापौरांनी पत्राद्वारे प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी नमूद केले की, मोकाट जनावरे हे प्लास्टिक खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. गटारी आणि नाल्यांमध्ये प्लास्टिक साचल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही पाणी साचून राहते, ज्यामुळे निवासी भागात पाणी शिरण्याच्या समस्या उद्भवतात. प्लास्टिक विघटन होत नसल्याने जमिनीचा पोत खालावून जमीन नापीक होत आहे.
शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी शहरात त्याचा सर्रास वापर होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत, महापौरांनी प्लास्टिक विक्रेते असोसिएशन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधून ठोस कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
या बैठकीला प्लास्टिक विक्रेते असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि संबंधित साहाय्यक आयुक्तांना (आरोग्य) अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीनंतर शहरातील प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.









