जळगाव (प्रतिनिधी) :- मयूर कॉलनी पिंप्राळा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात २० ते २७ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात पिंप्राळा परिसरातील सेवेक-यांनी मोठ्या संख्येने श्री गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला होता.
सप्ताहात श्री स्वामी समर्थ मंत्र जप, गणेश याग, मनोबोध याग,चंडी याग, स्वामी याग, मल्हारी याग व रूद्र याग तसेच विविध देवतांचे यज्ञ याग झाले. या सप्ताहात अध्यात्मिक, बालसंस्कार, गर्भसंस्कार,वास्तुशास्त्र, आरोग्य शास्त्र व संस्कृती तसेच अनेक समाज प्रबोधनपर विषयांवर वेळोवेळी सुभाष माने व ललित चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच दत्त जयंतीच्या दिवशी मराठी अस्मिता अंतर्गत सण वार, व्रत वैकल्य यांची प्रात्यक्षमांडणी करुन प्रबोधन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने वास्तुशास्त्र, गुढीपाडवा, दिवाळी, देव देव्हारा,बालसंस्कार व मानवी जीवनात येणाऱ्या समस्या या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते १२: ३९ वा. आरती करण्यात आली.
तसेच बालसंस्कार काळाची गरज हे पटवून देण्यासाठी बालसंस्कार व मुल्यसंस्कार विभागाच्या वतीने तसेच बालसंस्कार प्रतिनिधी रोहिणी बोरसे व संकेत चौधरी यांनी वृद्धाश्रम मुक्त भारत नाटिका सादर केली.नाटिका बघतांना सर्वच सेवेकरी भावूक झाले. अश्रू गळू लागले. पात्र कौशिक व तन्मय वाणी, मानसी पाटील, आरती व पूजा राजपूत, युगेंद्र माळी यांनी नाटक सदर केलें. तसेच सप्ताह सांगता केन्द्र प्रतिनिधी कांतीलाल शिरसाठ यांनी केली.