श्रावण महिन्यानिमित्त उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : येथील श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण महिन्यानिमित्त शिवमहिमा वाचन सुरू करण्यात आले आहे. वाचनासाठी परिसरातील महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे.
शिवमहिमा वाचन उपक्रमाच्या सुरुवातीला माजी महापौर सीमाताई भोळे, माजी नगरसेविका दीपमाला काळे यांची उपस्थिती होती तर माजी नगरसेवक अश्विन सोनवणे व प्रा. सचिन पाटील यांचे मंदिराला सहकार्य लाभत आहे. शिव महिमा वाचन उपक्रमावेळी उन्नती कुलकर्णी, ज्योत्स्ना धांडे यांनी श्रावण महिन्यात महादेवाचे नाम जप केल्यामुळे होणारे लाभ याविषयी उपस्थित महिला भाविकांना सविस्तर माहिती दिली.
प्रसंगी शिवमहिमा वाचनासाठी महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देत सहभाग घेतला. या वेळेला सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर शिवमहिमेने दुमदुमले होते.
असा आहे मंदिराचा इतिहास
श्रीकृष्ण कॉलनी येथील सन १९८२ पासून गेल्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. मागील अनेक वर्षात या मंदिराचा विकास होत होता. आता मंदिराचा सभामंडप देखील उभारण्यात आला. आता या मंदिराला नूतनीकरण करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिरात भगवान महादेव, श्री गणेश, श्री गोपालकृष्ण यांच्यासह त्रिपुरसुंदरी माता यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्रिपुरसुंदरी मातेचे हे खान्देशातील एकमेव मंदिर आहे. यातील श्री गणेश, श्री गोपालकृष्ण व त्रिपुरसुंदरी माता यांच्या मूर्ती ह्या राजस्थानमधील जयपूर येथून आणल्या आहेत. तर शिवलिंग हे मध्यप्रदेशातील बकावा येथून आणले आहे. या मंदिरावर २७ फूट कळस उभारण्यात आला आहे. अत्यंत सुंदर व आकर्षक अशा रचनेत हे सिद्धेश्वर मंदिर भाविकांना आकर्षित करीत आहे.