मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे एका घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घरात साठवून ठेवलेला सुमारे १७ क्विंटल कापूस आणि सागवानी दरवाजा जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

निमखेडी खुर्द येथील रहिवासी बाबुलाल नथ्थू डहाके (वय ५२) यांच्या घरात ही घटना घडली. २५ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घरातील विद्युत उपकरणात अचानक शॉर्ट सर्किट झाले. यातून ठिणग्या उडून घरात साठवलेल्या कापसाने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण कापूस आणि घराचा मौल्यवान सागवानी दरवाजा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
बाबुलाल डहाके यांनी आपल्या शेतातील उत्पादित केलेला १७ क्विंटल कापूस घरात विक्रीसाठी साठवून ठेवला होता. या आगीत कापसासह सागवानी दरवाजाचे मिळून एकूण १ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ऐन कापूस विक्रीच्या हंगामात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









