मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील रुईखेडा गावात आज रविवार दि. ११ मे रोजी सकाळी ११ वाजता इलेक्ट्रिक खांबावर काम करत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने महावितरण कंपनीच्या एका कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितेश अशोक पाखरे (वय २२, रा. टाकळी, तालुका मुक्ताईनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत नितेश हा आपले आई-वडील आणि मोठ्या भावासह टाकळी येथे वास्तव्यास होता. नितेश पाखरे हा आयटीआय शिक्षणानंतर गेल्या दीड महिन्यांपासून अग्रवाल कंपनीच्या ठेकेदाराच्या माध्यमातून महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता.(केसीएन)आज रुईखेडा गावात इलेक्ट्रिक पोलवर दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. नितेश काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खाली कोसळला.
त्याला तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.