नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासीम रिझवी यांनी आज हिंदू धर्म स्वीकारल्यावर त्यांना हरबीर नारायण सिंह त्यागी हे नवीन नाव मिळाले आहे.
शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच इस्लामचा त्याग करण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने त्यांनी आज गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात प्रवेश केला. धर्म बदलल्यानंतर त्यांचे नवीन नाव हरबीर नारायण सिंह त्यागी झाले आहे.
वसीम रिझवी यांनी आधीच मृत्यूपत्र जारी करत मृत्यूनंतर आपले दफन करण्यात येऊ नये, हिंदू परंपरेप्रमाणेच आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. नरसिंहानंद यांनी आपल्या चितेवर अग्नीसंस्कार करावेत, अशी इच्छा प्रकट केली होती. यानंतर त्यांनी हिंदू धर्मात प्रवेशाची घोषणा करून आज धर्मांतर केले आहे.
वसीम रिझवी मूळचे लखनऊचे आहेत. सन २००० मध्ये ते लखनऊच्या मोहल्ला काश्मिरी वॉर्डातून सपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. २००८ मध्ये ते शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य झाले आणि नंतर चेअरमन झाले. वसीम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण कोर्टाने ती फेटाळून लावली. या याचिकेसाठी सर्वोच्च न्यायालयाने वसीम रिझवी यांना दंडही ठोठावला होता. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. मात्र आज त्यांनी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर रिझवी म्हणाले की, मला आमच्याच लोकांनी इस्लाममधून बहिष्कृत केले, त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे.