जळगाव (प्रतिनिधी):- रुक्मिणी नगर परिसरात आयोजित शिवशक्ती विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. चैतन्य महादेव मंदिर येथे झालेल्या या संमेलनात हिंदू समाजाच्या एकतेवर व सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला ह.भ.प. योगीराज महाराज कानळेकर यांचे आशीर्वचन लाभले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी समाजात वाढत असलेल्या विविध सामाजिक समस्यांवर भाष्य करत लव्ह जिहाद या विषयावर जागृती करण्याचे आवाहन केले. समाजाने जागरूक राहून आपल्या संस्कृती व कुटुंब व्यवस्थेचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. अतुल दिलीपसिंग देशमुख, जळगाव जिल्हा सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी समाज परिवर्तनासाठी पंच परिवर्तन या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, स्वदेशीचा स्वीकार आणि नागरिक कर्तव्य पालन या पाच मूल्यांद्वारे समाज सुदृढ करण्याचे त्यांनी आवाहन केले.संमेलनात परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.










