संजय शिरसाट, अडसूळ, हेमंत पाटील यांना संधी
मुंबई (वृत्तसेवा) : राज्य सरकारने मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळांचं वाटप केलं आहे. यामध्ये आतापर्यंत केवळ तीन नेत्यांची नावे समोर आले आहेत. हे तीनही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. वाटप झालेल्या महामंडळात अद्याप भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील कुणाचंही नाव समोर आलेलं नाही.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत होते. अखेर विधानसभा निवडणुकीच्याआधी त्यांच्यावर राज्य सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे. संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले नांदेडचे माजी खासदार हेमंत पाटील यांनादेखील महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.