भाजपा-शिंदे गटात लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरूच
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून आता भाजपानंतर शिवसेना शिंदे गटाकडूनदेखील अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची नियुक्ती शनिवारी करण्यात आली आहे. जळगावच्या जागेसाठी भाजप व शिंदे गट मित्रपक्ष असले तरीही जागेवर आमचीच ताकद जास्त म्हणून दावा करीत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. राधेश्याम चौधरी यांची नियुक्ती निवडणूक प्रमुख म्हणून केली आहे. आता शिंदे गटाने देखील लोकसभा निवडणूक प्रमुखाची नियुक्ती करून, जळगाव लोकसभेच्या जागेवर आपला दावा केला आहे. शिवसेनेकडून गेल्या पंचवार्षिकपासून जळगाव लोकसभेसाठी दावा केला जात आहे. सुनील चौधरी हे अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. तसेच चौधरी हे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील मूळ रहिवासी आहेत.
तसेच, डॉ. राधेशाम चौधरी व सुनील चौधरी एकाच समाजाचे असून चांगले मित्रही आहेत. त्यामुळे लोकसभाची जागा पुन्हा आपल्याकडेच राहण्यासाठी भाजपाला या दोन्ही मित्रांची संघटनात्मक कौशल्याची मदत निवडणुकीत नक्कीच मिळणार आहे. जळगावची लोकसभा जागेवर खासदारकीची दोन्ही पक्षांच्या खास लोकांची वरिष्ठांकडे उठबस सुरु झाली आहे. नेते जातील तिकडे इच्छुक जाताहेत. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांना परत तिकीट मिळाले नाही तर पुन्हा कोणाला मिळेल याबाबत चर्चा सुरूच आहे. नव्याजुन्या कार्यकर्त्यांनी तयारी ठेवली आहे. तसेच, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी तर, जळगाव लोकसभा मतदारसंघात आमची ताकद जास्त आहे. त्यामुळे आम्हाला हि जागा मित्रपक्षाने लढू द्यावी अशी मागणी केली आहे.