मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत ८ जणांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नाहीत. ठाण्यावर भाजपने तर नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे.
याआधी भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार यांनी आपले उमदेवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवारी मात्र जाहीर करण्यात आली नाही. नाशिकच्या हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपचा विरोध आहे, त्याचवेळी राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या घरच्या ठाण्याच्या जागेवरच भाजपने दावा केला आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी म्हणून भाजप आग्रही आहे. तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिंदेही ती जागा सोडण्यास तयार नाहीत.
कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हे नक्की असलं तरी त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. तर दुसरीकडे यवतमाळ वाशिमच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. वाशिमच्या पाच वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे. तर संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी असा भाजपचा आग्रह आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
उमेदवारांची यादी
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
मावळ – श्रीरंग बारणे
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने