मुंबई :. धनुष्यबाणाबाबत 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दिली असून शिवसेना चिन्हाबाबत ठाकरे गट कोणती कागदपत्रे सोपवणार आणि काय निकाल लागणार याची मोठी उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.
27 सप्टेंबर ला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती. दरम्यान अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झालीय. पोटनिवडणुकीआधी निवडणूक आयोग धनुष्यबाणाचा निर्णय घेणार अशी शक्यता आहे. त्यामुळे आता 7 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणूक आयोगातल्या सुनावणीला महत्व आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शिंदे यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात न जाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत थेट शिवसेनेवर दावा सांगितला. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची, हा प्रश्न सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच राजकीय पक्षाच्या विषय असल्याने निवडणूक आयोगाचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे न्यायालयासह निवडणूक आयोग काय निर्णय देणार, याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र खरी शिवसेना कोणाची, याचा निर्णय न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या कोर्टात लागणार आहे.