जळगाव तालुक्यात पाचोरा रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणासह त्याचा मित्राला तिघांनी लोखंडी कड्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २३ रोजी रात्री पावणेबारा वाजता शिरसोली रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील राहूल संजय पाटील (वय २८) याच्यासह त्याचा मित्र समाधान यांचेसह दि. २३ रोजी रात्री पावणेबारा वाजता जेवणासाठी हॉटेल चंद्रमा येथे जात होता. यावेळी जैन व्हॅलीच्या प्रवेशद्वारासमोर त्याला भैय्या उर्फ वासुदेव ताडे, गणेश बारी, करण ताडे यांनी काहीही कारण नसतांना शिवीगाळ केली. दरम्यान, राहुल याने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली आणि तो मित्रासोबत जाब विचारण्याकरीता त्यांच्याजवळ गेला. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद होवून तिघांनी राहुलसह त्याच्या मित्राला मारहाण केली. या मारहाणीत गणेश बारी याने त्याच्या हातातील कड्याने राहुलच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत असलेल्या राहुलने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित भैय्या उर्फ वासुदेव ताडे, गणेश अशोक बारी, करण ताडे (तिघ रा. शिरसोली, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज गुळवे करीत आहे.