जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शिवकॉलनी थांब्यानजीक खाजगी क्लासेस चे मोठे बॅनर लावल्याप्रकरणी शैक्षणिक क्लास मालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून, जळगाव शहरात अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर प्रतिबंधात्मक कारवाई मोहीम अंतर्गत मनपाच्या उपायुक्त (महसूल) निर्मला गायकवाड-पेखळे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार किरकोळ वसुली विभागाचे कर्मचारी वसंत भास्कर पाटील यांच्यासह लिपीक अजय बिऱ्हाडे, नीलकंठ खडके, इकबाल शेख उसोद्दीन हे शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर्सची पाहणी करीत असताना शिवकॉलनी थांब्याजवळ एका शैक्षणिक क्लासचे अंदाजे १० बाय १० आकाराचे बॅनर लावलेले दिसले. त्या बॅनरवर मुदत नसल्याने ते विना परवानगी लावण्यात आल्याचे लक्षात आले. हे बॅनर जप्त करण्यात आले व या प्रकरणी वसंत पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून क्लास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.