जळगाव (प्रतिनिधी) : स्वराज्याचे रक्षक, निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अफाट आहे. आयुष्यात आपण त्यांच्या जीवन चरित्रातून योग्य दिशा घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त (शिवजयंती) १९ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ७ वाजता प्रभाग ७ येथे शिवकॉलनी स्टॉप परिसरात महाराजांच्या एका भव्य-दिव्य प्रतिकृतीचा दर्शन सोहळा पार पडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, महापालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा प्रभागातील नगरसेवक विशाल भोळे, नगरसेविका अंकिताताई पाटील, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, सामाजिक कार्यकर्ते नरेश सोनवणे, राम पवार उपस्थित होते. “शिवराय मना-मनात, शिवजयंती घराघरात” या संकल्पनेतून साकारलेला हा सोहळा शिवप्रेमींसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचन प्रत्येक कुटुंबीयांनी केले पाहिजे.त्यांचे मार्गदर्शक संदेश आपण आचरणात आणले पाहिजे, असे महापौर दीपमाला काळे म्हणाल्या. शिवरायांचे विचार घराघरात पोहोचावेत या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात महाराजांच्या आकर्षक प्रतिकृतीचे शेकडो नागरिकांनी दर्शन घेतले.
कार्यक्रमाचे आयोजक पंकज सुरेश पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश्य स्पष्ट केला. शिवनेरी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.









