शिवनेरी ग्रुपतर्फे हळदी कुंकूसह विविध उपक्रमांचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिव कॉलनी परिसरात शिवनेरी ग्रुपतर्फे आयोजित महिला मेळावा आणि हळदी-कुंकू समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात प्रभाग ७ मधील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांना महिला भगिनींनी मोठा पाठिंबा दर्शवला असून, विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.


सामाजिक कार्यकर्त्या अंकिता पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रभाग ७ मधील १ हजारपेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती लावून विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला शक्तीचे दर्शन घडले. याप्रसंगी माजी महापौर सीमा भोळे, प्रभाग ७ मधील उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे, दीपमाला मनोज काळे आणि विशाल सुरेश भोळे उपस्थित होते. उमेदवारांनी महिलांशी संवाद साधून प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी महिलांनी “आम्ही चंद्रशेखर अत्तरदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशा भावना व्यक्त केल्या, तर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना विजयासाठी भरभरून आशीर्वाद दिले. शिवनेरी ग्रुपच्या वतीने आयोजित या मेळाव्याने प्रभाग ७ मधील राजकीय वातावरणात मोठी चुरस निर्माण केली आहे. अंकिता पाटील यांच्या नेतृत्वात महिलांची ही मोठी फळी आता चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे.









