जळगाव तालुक्यात तरुणाचे दीड लाखांचे नुकसान
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली गावात मंगळवारी दि. २९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता शॉर्टसर्किटमुळे एक प्रवासी रिक्षा जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रिक्षाचालक गोकुळ सुकलाल अस्वार यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून, या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
शिरसोली येथील रहिवासी असलेले गोकुळ सुकलाल अस्वार (वय ३५) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची (एम.एच. १९ सी.डब्ल्यू. ६६५९) क्रमांकाची प्रवासी रिक्षा नेहमीप्रमाणे घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षात अचानक शॉर्टसर्किट झाले आणि क्षणातच रिक्षाने पेट घेतला.(केसीएन)आगीने रौद्ररूप धारण केल्याने अवघ्या काही मिनिटांतच रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी २९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. या घटनेमुळे गोकुळ अस्वार यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाले असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार धनराज गुळवे करत आहेत.