ग्रामस्थांना समाजकल्याण विभागातर्फे मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय सप्ताहाच्या निमित्ताने जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या स्वच्छता अभियानामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय जळगाव येथील कर्मचारी जितेंद्र धनगर यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व विशद करतानाच ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमावेळी समाजकल्याण निरीक्षक एस.एस. महाजन, एस.एस. क्षत्रिय, अरुण वाणी, विशाल वसतकर, दिनेश जोहरे यांची उपस्थिती होती. तसेच शिरसोली प्र.न. गावचे सरपंच हिलाल मल्हारी भिल, उपसरपंच द्वारकाबाई तुकाराम बोबडे आणि पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी हे पदाधिकारीही कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र धनगर यांनी तर आभार प्रदर्शन अर्जुन गायकवाड यांनी केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छ भारत अभियानास हातभार लावण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.