शिरसोली [वार्ताहर] : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरसोली येथे आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी भूषवले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत कुमावत, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, मनीषा अस्वार, मनीषा पायघन आणि कांचन धांडे उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत टिळकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. क्रीडा शिक्षक संजय काटोले आणि दीपक कुलकर्णी यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या राष्ट्रसेवेवर प्रकाश टाकला.
मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात टिळकांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत कुमावत यांनी केले. सूत्रसंचालनाची धुरा मनीषा अस्वार यांनी यशस्वीपणे सांभाळली, तर कांचन धांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकमान्य टिळकांच्या कार्याबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली.