अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शिरसोली शिवारातून अज्ञात चोरट्यांनी दोन म्हशी आणि एका रेडकाची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ८२ हजार रुपये किमतीच्या पशुधनाची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी राहुल हिम्मत पाटील (वय ३१, रा. शिरसोली प्र.बो., ता. जि. जळगाव) यांचे शिरसोली शिवारात गट नंबर ५६६ मध्ये शेत आहे. दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश केला. राहुल पाटील आणि त्यांचे चुलत भाऊ विशाल काशिनाथ पाटील यांच्या मालकीची जनावरे चोरट्यांनी लंपास केली.
एकूण ८२,००० रुपये किमतीचे पशुधन चोरट्यांनी मालकाच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे. या घटनेबाबत राहुल पाटील यांनी दि. ३० जानेवारी रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज गुळवे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









