उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील एका ७४ वर्षीय वृद्धाचा शुक्रवारी दि. १७ मे रोजी दुपारी ४.२० वाजता चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
वसंतराव भगवान माळी (वय ७४, रा. शिरसोली ता. जळगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते शुक्रवारी धरणगाव तालुक्यातील वंजारी खपाट येथे आपल्या नातेवाईकाकडे आयोजित लग्नासाठी गेले होते. दुपारी ४ वाजता ते शिरसोली येथे परत आले. त्यांना काही वेळ अस्वस्थ वाटत असल्याने, गावातील बाजारपट्टा भागात काही वेळ बसले. अचानक ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले.
सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. वसंतराव माळी यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. वसंतराव माळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.