शिरसोली (वार्ताहर): येथील देवेंद्र प्रमोद पाटील प्राथमिक विद्या मंदिर, हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय व जगतराव बारकू पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले ध्वजारोहण शिरसोली (प्र.बो.) चे सरपंच नितीन अर्जुन बुंधे यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रगीताच्या सुरांनी आणि तिरंग्याला दिलेल्या सलामीने परिसरातील वातावरण भारावून गेले होते.
याप्रसंगी जिजामाता विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक, उत्तर महाराष्ट्र राज्य फेस्कॉमचे अध्यक्ष व शाळेचे अध्यक्ष आप्पासो. जगतराव बारकू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शालेय समिती चेअरमन प्रमोद जगतराव पाटील, शिरसोलीचे माजी सरपंच प्रदीप पाटील, पीक संरक्षण सोसायटीचे सचिव पुनमचंद भादु माळी, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव भिकन खाटीक, सदस्य मोहम्मद पिंजारी, पोलीस पाटील शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. यामध्ये सामूहिक संगीत कवायतमध्ये शिस्तबद्ध हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘ए मेरे वतन के लोगो’ सारख्या गीतांनी वातावरण देशप्रेमाने भरून दिले.
विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानावर ओघवती भाषणे केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









