शिरसोली (वार्ताहर): येथे एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिर शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहात संपन्न झाले. २० जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत राबवण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिरसोली ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.


कार्यक्रम अधिकारी प्रा. गणपत धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता अभियान आणि प्लास्टिक मुक्ती अभियान राबवले. पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शोष खड्डे तयार केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता करून एक नवा आदर्श समोर ठेवला. केवळ श्रमदानच नव्हे, तर प्रबोधनाच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पथनाट्यांद्वारे मतदान जनजागृती, कौटुंबिक हिंसाचार, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि सध्याच्या काळातील महत्त्वाचा विषय असलेल्या सायबर सिक्युरिटी संदर्भात माहिती देण्यात आली.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या शिबिराचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवा कुमार रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून रासेयो जिल्हाध्यक्ष डॉ. राजू गवारे, बारी समाज माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष निलेश खलसे, शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी, मुख्याध्यापक गोपाल बारी व प्रा. गणपत धुमाळे उपस्थित होते. डॉ. राजू गवारे यांनी सांगितले, “अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांवर मूल्यात्मक संस्कार होतात, जे त्यांच्या भावी आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरतात.डॉ. रेड्डी यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले.
प्रारंभी, प्रा. धुमाळे यांनी सात दिवसांच्या उपक्रमांचा आढावा मांडला. कमलेश सोनवणे, अंजली आंदोरे, हेमलता महाजन आणि गौरव निमकर्डे या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शनानंतर शिबिराची सांगता झाली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिरसोली ग्रामस्थ आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले.








