जळगाव ( प्रतिनिधी) – शिरसोली येथील ३३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीला आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गिरीष प्रकाश पाटील (वय-३३) असे या तरूणाचे नाव आहे.
गिरीष पाटील आई वडील, पत्नी आणि भाऊ यांच्यासह शिरसोली येथे वास्तव्याला आहे. १३ वर्षांपासून बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला आहे. गुरूवारी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना मागच्या खोलीत गिरीष पाटील याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी रेणूका ह्या शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता झोपेतून उठल्या त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला होता. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई सुनंदाबाई, वडील प्रकाश पाटील, भाऊ सतिष आणि पत्नी रेणूका असा परिवार आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला