अरे देवा… अंत्यसंस्कार झालेल्या महिलेच्या अस्थि आणि दागिन्यांची चोरी
शिरसोली येथिल स्मशान भूमीतील धक्कादायक प्रकार
शिरसोली (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील स्मशान भूमी तीन दिवसांपूर्वी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावरील सुमारे दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह अस्थि व राख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत नातेवाईक यांनी दिलेली माहिती अशी की शिरसोली प्र.न. येथील रहिवासी असलेल्या सुमनबाई चावदस पाटील यांचे मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता निधन झाले होते. त्यांच्यावर बुधवार दि. १० रोजी सायंकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र तीन दिवसानंतर पारंपरिक विधी नुसार अस्थी घेण्यासाठी आज त्यांचे कुटुंबीय सकाळी ८ वाजता शिरसोलीच्या स्मशानभूमीत आले असता या ठिकाणी मयत सुमनबाई पाटील यांच्या डोक्या खालील भागाची राख आणि अस्थी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच आणखी धक्कादायक बाब म्हणून सुमनबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे दीड ग्रॅम चे दागिने ही अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. या घटनेनंतर सुमन पाटील यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून अज्ञात चोरट्याला पकडून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान अस्थिचोरी आणि दागिने चोरीच्या प्रकारामुळे शिरसोली परिसरात खळबळ उडाली आहे.









