जळगाव ( प्रतिनिधी ) – विवेकानंदनगरात पायी जाणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून त्यांच्या हातातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात तीन जणांनी हिसकावून दुचाकीने फरार झाले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रशांत सुर्यभान झाल्टे (वय-३३ , रा. प्रेम नगर ) शिक्षक आहेत. ६ सप्टेंबररोजी रात्री ते विवेकांनदनगरातील विवेकानंद बगीचा येथून शाळेचे सहकारी एम.एस. सुरवाडे यांच्याकडे शाळेच्या कामकाजासाठी आले होते. काम आटोपून घरी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान पायी जात असतांना अज्ञात तीन जण दुचाकीवर त्यांच्यासमोर आले. तिघांनी शिक्षक प्रशांत झाल्टे यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. प्रशांत झाल्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.