भडगाव तालुक्यातील गुढे येथे शोककळा, एरंडोल नजिक घडली घटना
भडगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहरात एका केंद्रावर कर्तव्य बजावल्यानंतर ईव्हीएम मशीन जमा करून घराकडे परतणाऱ्या शिक्षकाचा एरंडोलनजिक रस्त्यातच हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ते भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी होते.
विजय भास्कर पाटील (४८) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते पथराड तांडा ता. भडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. गुढे ता. भडगाव येथील रहिवासी असलेले विजय पाटील यांना जळगाव येथील अंध माध्यमिक विद्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.
दि. २० रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यावर ईव्हीएम आणि इतर साहित्य त्यांनी जमा केले. यानंतर ते मित्रांसह खासगी वाहनाने गुढ्याकडे परतत होते. त्यावेळी एरंडोलनजीक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सोबतच्या मित्रांनी त्यांना जळगावला आणले. उपचार सुरू असतानाच त्यांचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
ते भास्कर सहादू पाटील यांचे पुत्र तर गुढे येथील माध्यमिक शिक्षिका पूनम पाटील यांचे पती होत. बुधवारी रात्री चोपड्याकडून बभळाजकडे परतणारे बीएलओ लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४८) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जातील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.