चोरट्यांचा उच्चभ्रू वस्तीकडे मोर्चा
जळगाव (प्रतिनिधी) – चोरटयांनी आता उच्चभ्रू वस्तीकडे देखील लक्ष वळविले असून एका शिक्षिकेचे मंगळसूत्र लांबवीले आहे. याबाबत अज्ञात दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिणी विजयकुमार नारखेडे (वय-३९, नवीन भगवान नगर, गिरणा टाकी परिसर, जळगाव) त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. शुक्रवारी ३० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रोहिणी नारखेडे या भगवान नगरातील किलबिल शाळेजवळून पायी जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर आले. त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची पोत जबरी हिसकावून पसार झाले. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही संशयित हे दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले.महिलेने तात्काळ याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून दोघं संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देखमुख करीत आहे.