जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाला शिफारस करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शुक्रवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी समिती गठीत केली आहे. त्यात प्राध्यापकांच्या एन-मुक्टो संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष तथा रावेर येथील नाईक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनिल पाटील यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्यातील प्राध्यापकांचा पीएचडी इन्क्रिमेंटच्या वेतनवाढी थांबलेल्या आहेत. एम फील पात्रता धारक प्राध्यापकांच्या पदोन्नत्या थांबल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच, नवीन पदभरतीविषयी सकारात्मक हालचाली सुरु आहे. अशा विविध समस्या मार्गी लागण्यासाठी शासन अनुकूल आहे.
त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शुक्रवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी १७ सदस्यीय समिती गठीत केली आहे. यात ६ विधानपरिषद सदस्य, एन-मुक्टो संघटनेचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. अनिल पाटील तसेच ३ शिक्षक प्रतिनिधी, १ शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीच्या सहा सदस्यांची निवड केली आहे. डॉ. अनिल पाटील हे रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. एस. नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक असून त्यांच्या निवडीमुळे खान्देशचे प्रतिनिधित्व मंत्रालयात उमटणार आहे.
निवडीबद्दल डॉ. अनिल पाटील यांनी राज्य शासनाचे आभार मानून सांगितले की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याकरिता थेट समिती गठन झाल्याने आता समस्यांचा गुंता लवकर सुटण्यासाठी मदत होईल. यामुळे शासन व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक संवाद कायम राहील असे ते म्हणाले.