चौकशी करण्याचे जळगाव न्यायालयाचे पोलिसांना आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण येथील शेतशिवारातील जागेत जागामालकाची कुठलीही परवानगी न घेता वीज रोहित्र (डीपी) बसविल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह इतर व्यक्तींच्या दाखल गुन्ह्यात न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. याबाबतचे आदेश मागील महिन्यात पारित करण्यात आले आहे.
चंद्रशेखर रामनारायण मंत्री (वय ४७) यांनी सुनील मंत्री यांचेसह महावितरण अधिकारी अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे, मुख्य अभियंता सुरेश पंचांगे, कार्यकारी अभियंता संजय तडवी, नरेंद्र चौधरी यांच्याविरोधात कोर्टात २९ सप्टेंबर २०१७ रोजी न्यायालयात धाव घेतली होती. सुनील मंत्री यांचे गट क्रमांक ७८ मध्ये वीज रोहित्र बसविण्याबाबत शासन आदेश मंजूर होता. मात्र महावितरण अधिकाऱ्यांनी तसे न करता फिर्यादी चंद्रशेखर मंत्री यांच्या मेहरूण शेतशिवारात गट क्रमांक ७९ मध्ये रोहित्र बसविले.
या बेकायदेशीर कृत्याविरोधात फिर्यादी चंद्रशेखर मंत्री यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकारी श्री मुगळीकर साहेब यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल त्वरित सादर करावा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना ११ जानेवारी २०२२ रोजी आदेश दिले आहे.