जिल्हा पणन अधिकाऱ्यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : – राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढवून ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत केली आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आता आधारभूत किमतीवर विक्रीसाठी आणखी संधी मिळणार आहे.
पणन महासंघाचे संचालक तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळाने राज्य शासन व केंद्र शासनाकडे ज्वारी खरेदी कालावधी वाढवण्याची विनंती केली होती. केंद्र शासनाने ती मान्य करून ३० सप्टेंबर पर्यंत ज्वारी खरेदीस परवानगी दिली आहे. या निर्णयाची अधिकृत माहिती मंत्रालयातून प्रसिद्ध करण्यात आली असून शासन निर्णयानुसार खरेदी करताना केंद्र शासनाच्या पत्रातील सर्व अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. असे जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.