बिबट्याच्या हल्ल्यात मृत इंदुबाई पाटील यांच्या वारसांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द
जळगाव (प्रतिनिधी) :- देवगाव येथील घटना अतिशय दुर्दैवी असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी ट्रॅप व पिंजरे लावण्यात आले असून, आरआरटी पथक सतत गस्त घालत आहे. शेतकरी व वनमजूर यांनी शेतात जाताना एकटे न जाता समूहाने जावे, गुरेढोरे बंदिस्त ठेवावीत आणि विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
मृतकाच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले की, एकूण २५ लाखांच्या आर्थिक मदतीपैकी आज १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून, उर्वरित १५ लाख रुपयांचा धनादेश लवकरच देण्यात येईल. प्रशासन व वन विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता मौजे देवगाव फुकणी येथे शेतात कपाशी पिकाची निंदणी करत असताना वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ७३ वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांचे शेत (गट क्र. ५५) गिरणा नदीलगत असून, वनपरिक्षेत्र एरंडोल व राजवड यांच्या सीमेजवळ आहे. हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देऊन वन्यप्राणी हुसकावून लावला. पोलिस पाटील यांनी वन विभागाला कळवून घटनास्थळी वनक्षेत्राधिकारी, कर्मचारी, आर आर टी पथक आणि पोलिस विभागाने धाव घेऊन पंचनामा केला.
घटनेनंतर त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे व पिंजरे बसवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी फुपणी गावाजवळ बिबट्याने गायीवर हल्ला केल्याची घटना घडली असून, त्यावरही तातडीने कारवाई करण्यात आली आहे. शासन नियमांनुसार एकूण २५ लाख सानुग्रह अनुदानापैकी मृतकाच्या वारसांना आज १० लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर, नायब तहसीलदार राहुल वाघ, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, शेतकी संघाचे विजय पाटील, दिपक सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, सरपंच जितु पाटील, किशोर पाटील, समाधान सपकाळे, योगेश पाटील, दिलीप आगिवाल, गोपाल जिभाऊ, मुरलीधर अण्णा पाटील, प्रमोद सोनवणे, बाला शेठ राठी, गजानन सोनवणे, वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक भरत पवार, अजय रायसिंग, रहीम तडवी, हरेश थोरात, विलास पाटील, राहुल पाटील, गोकुळ सपकाळे, पोलिस पाटील रमेश पाटील तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी केले. तर आभार पोलिस पाटील रमेश पाटील यांनी मानले.